वजन कमी करायचंय तर हे करा

“वजन कमी करायचंय? मग आधी तसे मनात आणा आणि एकदा मनात असा विचार आणलात की त्यासाठी पुढे जे काही करावे लागेल ते इमाने इतबारे करा. पाहा तुमचा भार हलका होतो की नाही ते?. उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त अनूकूल आहे. तसेही थोडीशी हालचाल केली की घाम हा येतोच. तेव्हा व्यायाम करा आणि जास्त घाम गाळा. पाणी भरपूर प्या मात्र खाणं मात्र कमी करा.

जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही ३२ हून ३६ झाली तर कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.

अतिसेवन

वारंवार खात राहणे, फास्ट फूड खाणे, तेलकट, मसालेदार आणि चरबीयुक्त अन्नाचे सतत सेवन, मद्यपान, अमर्याद चहा आणि कॉफी यांचे सेवन, हॉटेल मध्ये वारंवार जेवणे.

अवेळी भोजन

दोन वेळा ठरवून जेवणे हे निसर्गाच्या नियमाला धरुन आहे. पण, या नियमाचे पालन केले नाही आणि वेळ मिळेल तेव्हा अथवा वाट्टेल तेव्हा भोजन केले की वजन वाढते.

जेवणाची चुकीची पध्दत

गडबडीत जेवणे, टीव्ही पहात अथवा वाचन करत जेवणे, गप्पा मारत जेवणे, जेवल्यावर ताट बाजूला सरकवून तिथे लगेच झोपणे

विरुध्द अन्न खाणे

मासे, दूध, दही, फळे, पनीर हे आणि यापासून बनविलेले पदार्थ एकमेकांच्या विरुध्द आहेत. त्यांचे एकाच वेळी सेवन करणे. जिभेवर ताबा न ठेवता काहीही आणि कधीही, कसेही खाणे.

व्यायामाचा अभाव

वजन वाढण्याचे हे सगळ्यात मुख्य कारण आहे. एकाच जागी बसून काम करणे, अजिबात व्यायाम न करणे, चालण्याचा कंटाळा करणे

अनुवंशिकता

काही व्यक्ती मध्ये लठ्ठपणा ही अनुवंशिकता असते. त्यांनी वजन कमी करण्यासाठी फार कडक उपाय योजना करु नयेत. अशांनी यासाठी तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटावे आणि उपाय करावेत.

थायरॉईड

थायरॉईड ग्रंथींचे कार्य बिघडले तर काही व्यक्तींना लठ्ठपणा अथवा वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरात अचानक बदल झालाय असे लक्षात आले तर तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटून थायरॉईडची समस्य़ा आहे का? याचे निदान करुन घ्यावे.

चिंता

वारंवार चिंता करणे, सतत ताण तणावात राहणे यामुळेही वजन वाढते. लठ्ठपणामुळे अथवा वाढत्या वजनामुळे ब्लडप्रेशर, डायबेटीस (मधुमेह), संधीवात, आमवात, हृदयरोग, त्वचा विकार, पित्ताशयाशी निगडीत व्याधी, मूतखडा, नपुसंकता, लैंगिक समस्या, चक्कर येणे, श्वसनाचे आजार, दम लागणे, लवकर म्हातारपण येणे असे गंभीर आजार होवू शकतात.

लठ्ठपणा कमी करणारे पदार्थ

  • धान्य – जव, बाजरी, नाचणी, वरी, जुने तांदूळ.
  • भाज्या – परवर, पडवळ, शेवगा, कारले, दुधी, तोंडली, दोडकी, घोसाळी, कोहळा, तांबडा भोपळा वगैरे भाज्या अन मेथी, तांदुळजा वगैरे पालेभाज्या.
  • कडधान्य – कुळीथ, तूर, मूग.
  • फळे – आवळे, मोसंबी, संत्री, अंजीर, पपई, जांभूळ, डाळिंब, सफरचंद, द्राक्षे वगैरे फळे.
  • कंद – गाजर, लसूण, मुळा, आले.
  • मसाल्याचे पदार्थ – दालचिनी, मोहरी, मिरे, जिरे, वेलची, हळद, ओवा, धणे, हिंग, पुदिना, कोथिंबीर.
  • दुधाचे पदार्थ – हळद-सुंठीने संस्कारित दूध (फक्‍त दिवसा), ताक.
  • मध, साळीच्या लाह्या, विड्याचे पान, आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेली आसवारिष्टे, सैंधव मीठ.
  • घरी बनविलेले साजूक तूप, खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.

Leave a Reply