७ ते ९ एप्रिल या दिवसांदरम्यान राज्यात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ या भागात पावसामुळं शेतपिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

पाऊस स्थिति –
विजेच्या कडकडासह वादळी पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली होती. तर ढग दाटून आल्याने काही प्रमाणात भर दुपारी काळोख झाला होता. त्यामुळे भर दुपारीसुद्धा दुचाकी व चारचाकी चालकांना हेडलाईट लावून रस्त्याने प्रवास करावा लागत होता. दरम्यान, मार्च महिन्यात सुद्धा अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यात अमरावती जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालं होतं. तर शुक्रवारी झालेल्या पावसामुळे अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे शनिवारीसुद्धा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात ‘या’ भागात बरसणार पाऊसधारा …
भंडारा – पावसाची जोरदार हजेरी
हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार भंडाऱ्यातही विजेच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान हजेरी लावली आहे. तासभर आलेल्या पावसाने भंडाऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान वादळी वाऱ्याने घर-गोठयाचे नुकसान झाले असून पावसाने धान पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
वर्ध्या (कारंजा ,आष्टी) – अवकाळी पावसासह गारपीट
दुसरीकडे वर्ध्यातील कारंजा ,आष्टी परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होताच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा हजेरी लावली. यात काही भागात गारपीट झाली आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
यवतमाळ (महागांव ) – वीज कोसळून २ बैल ठार
यवतमाळच्या महागांव तालुक्यातील थार बुद्रक येथील शेत शिवारात वीज कोसळल्याने बैलजोडी ठार झाली आहे. शेतात झाडाखाली ही बैल जोडी बांधलेली असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यातच वीज पडून दोन्ही बैल जागीच ठार झाले. रेणुकादास शिंदे या शेतकऱ्याची ही बैल जोडी होती.

देशातील हवामानाची काय परिस्थिती?
‘स्कायमेट’च्या (Skymet) अंदाजानुसार, पुढील २४ तासांमध्ये आसाम, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल. तर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पर्वतीय पट्ट्यांमध्ये हलक्या स्वरुपातील बर्फवृष्टी होऊ शकते. उर्वरित पूर्वोत्तर भारत, केरळ, तामिळनाडूच्या काही भागांत हलक्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आलीआहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, कर्नाटक, ओडिशा, हिमालयाचा पश्चिम भाग आणि पंजाबमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं देशातील बहुतांश राज्यांत पावसाचा शिडकावा होऊ शकतं अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. किमान २ ते ३ दिवसांनी ही परिस्थिती सुधारणार असून, त्यानंतर कमाल तापमानात वाढ होईल.
हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), काश्मीरचं खोरं (Kashmir), स्पितीचं खोरं या भागांत थंडी काही अंशी वाढेल, तर अती उंचीवर असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टीचाही इशारा हवामान खात्यानं दिला आहे. सध्याच्या घडीला हिमाचल आणि त्या आजुबाजूच्या पट्ट्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या पाहता तिथल्या हवामानाचा अंदाज घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.